Advertisement

शिक्षक अतृप्त असतील तर तो देश कधीच आनंदी होऊ शकणार नाही


*शिक्षक अतृप्त असतील तर तो देश कधीच आनंदी होऊ शकणार नाही.*

- सर्कशीत रिंगमास्टरच्या हंटरला घाबरणारा सिंह गुरगुरणार्‍या मांजरीहून केविलवाणा वाटतो. माणूस शिकला की तो दुबळा होतो, असं वाटायला लागावं अशी परिस्थिती होत आहे. खेड्यापाड्यातसुध्दा मुजोर आणि गुर्मी असणारा असा एक संस्थाचालकांचा उर्मट वर्ग असतो. त्यांना वाटतं, नोकरीसाठी लाचार असणार्‍या माणसांना केव्हाही कुठेही फटकारत रहावं. आत्मविश्वास गमावलेली, मनाला महारोग झालेली अधिकारी माणसे आपली भग्न निराशा हाताखालच्या माणसांना छळण्यात उगाळून घेतात. नुकताच एका शाळेत भाषणाला गेलो होतो. भर स्टेजवर तिथला रानगेंडा अधिकारी एका शिक्षकावर खेकसला—"प्रमुख पाहुण्यांच्या नावाआधी माननीय लिहायला हवं होतं, कुणी लिहिलंय हे? मला त्याचं नाव द्या नंतर बघतो त्याला." आतडं ताडताड तुटलं. मी म्हटलं,"अहो, काय बिघडलं? बाकी केवढी मेहनत घेतलीय सर्व शिक्षकांनी ती बघा. एक कार्यक्रम उभा करायचा म्हणजे केवढे परिश्रम असतात." तर म्हणाला,"वेळीच ठेचायला लागतं नाहीतर मुजोर होतात."
परमेश्वरा ! असे अधिकारी शिक्षकांना कसे फुलू देणार ? आणि न फुललेले शिक्षक मुलांना कसे फुलविणार ? कोकणातल्या एका शाळेतला शिक्षक मनमोकळ्या गप्पा करताना म्हणाला,"काही चुकलं, नाही म्हटलं की दूरवर बदल्या करतात. बदल्यांच्या भीतीनं अनेक अन्याय निमूट गिळले जातात. त्यातही लोचट आणि चमचा, लाळघोटू शिक्षकांची एक जात असते; ती स्वाभिमानी, विद्यार्थीप्रिय शिक्षकाला सुखाने जगू देत नाही. मग केवळ पाट्या टाकणे सुरु होते." मूळ पाड्यापासूनही दूरदूर ही गोठेवजा शाळा असते. मैलोनमैल चिल्लीपिल्ली चालत येतात. थकून जातात. ज्यांची शाळा एवढी दूर, त्यांचे शिक्षक एवढे खचलेले तो माझा देश जगाच्या नकाशावरील एक आनंदी राष्ट्र कसे होणार?
ज्या देशातले सैनिक, शेतकरी आणि शिक्षक अतृप्त आहेत तो देश कधीच आनंदी होऊ शकणार नाही.
तसंच कष्टाने दारिद्र्यावर मात करुन काही माणसे शिकतात, मोठी होतात, निवडणूका लढवून मंत्री होतात. हातात निर्णयाची क्षमता येते. सत्तेची गुबगुबीत खुर्ची येते. त्यांना आपले शिक्षक आठवत नाहीत का ?आपण ज्यांच्याकडून शिकलो ते शिक्षक कदाचित निवृत्त झाले असतील किंवा मरुन गेले असतील, पण ऋण फेडण्याची ही संधी हाती घ्यावी असं त्यांना का नाही वाटत ?सगळेच संवेदनाशून्य झालेत का ?शिक्षणक्षेत्राची पुनर्रचना केवळ दर वर्षी पाठ्यपुस्तकातला मजकूर बदलून होणार नाही. शिक्षकांना त्यांचं कर्तव्य समजावून सांगण्यासाठी त्यांची दु:खं दूर करण्याची गरज आहे. इथला शिक्षक तृप्त, आनंदी तर मुलं आनंदी! हा आनंद त्यांना आपण केवळ पगार वाढवून देणार नाही. शिक्षकाच्या मनाभोवती लाचारीचे वलय आम्हीच निर्माण करत आहोत, ते जायला हवे. इथल्या शाळांना मान्यता, अनुदाने देऊन अनुकूलता निर्माण करायला हवी. वाचनालये समृध्द करायला हवीत. 
#*#*#*#*#*#*#*#*#*#*#

*लेखक—प्रा. प्रवीण दवणे*
*पुस्तक संदर्भ— दिलखुलास*

Post a Comment

0 Comments